BLOG

तंत्रज्ञान हेच ‘न्यू नॉर्मल’!  
 
साधारण महिनाभराच्या ब्रेक नंतर आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागलंय. आता थोडी थोडी आपल्या सर्वांनाही घरात बसायची, घरून काम करायची सवय लागली आहे. गेल्या काही महिन्यात आपण सगळ्यांनीच पूर्वी कधीच विचारही न केलेलं वास्तव अनुभवलं आहे. घरात राहणं हाच उपाय होऊन बसलाय. एरव्ही दिवसातले १२ – १४ तास घराबाहेर असणारी मंडळी सलग ३ – ४  महिने घरात बसली. पण, हे असं घरात राहणं सुसह्य होण्यात तंत्रज्ञानाचा खूप मोठा हातभार आहे, हे विसरून चालणार नाही. मनोरंजन करणं आणि करून घेणं, ज्ञान देणं आणि ज्ञान मिळवणं, काम करणं – काम पाठवणं आणि जगभरातल्या लोकांशी संपर्क ठेवणं या साऱ्यासाठी आपण तंत्रज्ञान आणि विशेषकरून इंटरनेटचा यथेच्छ वापर केला आहे. एरव्ही समोरासमोर होणाऱ्या मिटींग्ज, रोजचे शाळा – कॉलेजचे वर्ग, इतकंच काय पण वाढदिवसापासून अगदी लग्नापर्यंतचे सोहळेही सहज घरबसल्या अनुभवायला आपण शिकत आहोत. हेच ते ‘न्यू नॉर्मल’ असं म्हणायला हरकत नाही. 
 
तीन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे सगळं जगच प्री लॉकडाऊन आणि पोस्ट लॉकडाऊन अशा दोन काळांत विभागलं गेलंय. कोरोनाने आपल्या सगळ्यांच्याच जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून आणलाय आणि आपण हळूहळू त्या बदलाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अर्थातच, या लॉकडाऊनचा फटका अनेक व्यवसायांना बसलेला आहे. पण, त्यातूनही नवे मार्ग काढत आपण सर्वांनीच आपापल्यापुरत्या नव्या वाटा बनवल्या आहेत. 
लॉकडाऊननंतर लोकांचं ऑनलाईन सोशलायझिंग वाढलं आहे. म्हणजे आता नातेवाईकांना, मित्रांना भेटता येत नाही, म्हणून व्हॉटसअप ग्रुपवरचं बोलणं, ग्रुप व्हिडीओ कॉल्स करून वेळ घालवला जात आहे. अनेक लोकांनी वेगवेगळ्या गोष्टींचं ज्ञान देण्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्रामवरून लाइव्ह यायला, लोकांशी गप्पा मारायला सुरुवात केली. काही सामाजिक, सांस्कृतिक गटांनी, कलाकारांनी लाइव्ह कॉन्सर्ट घेतल्या. झूम कॉलवरून सेलिब्रेशन पार्टीज केल्या. इतकंच नाही, तर शाळा, कॉलेजच्या वर्गाप्रमाणे नृत्य, संगीत, भाषांचे ऑनलाईन लाईव्ह क्लासेस घेतले गेले. कॉर्पोरेट सेमिनार्सची जागाही आता वेबिनार्सनं घेतलीय.
 
जिमला जाणारे किंवा बाहेर जाऊन दररोज व्यायाम करणाऱ्यांचं फिटनेस संभाळलं जावं यासाठी अनेकांनी, दररोज लाईव्ह फिटनेस क्लासेस घेऊन घरच्या घरी करण्याचे व्यायाम प्रकारांचे सेशन्स घेतले. अनायसे बाहेरचं जंक फूड खाणं बंद झालंय आणि जास्तीचा वेळ मिळालाय म्हणून अनेक लोकांनी आपापल्या शरीराच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला नव्याने सुरुवात केली. अशा सर्वांना ऑनलाईन मार्गदर्शनाचा फार उपयोग झाला. 
लोकांनी खास एकत्र जमावं यासाठी केले जाणारे लग्नासारखे सोहळेही अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत साजरे होत आहेत. आयुष्यातील इतक्या महत्त्वाच्या प्रसंगी आपले आप्तजन उपस्थित असावेत यासाठी लग्नाचं लाईव्ह स्ट्रीमिंग करायला नव्याने सुरुवात झाली. अशा सोहळ्यांच्या आठवणी साठवण्यासाठी फोटोग्राफी, व्हिडीओग्राफी केली जाते. पण, त्यासोबतीने आता लाइव्ह स्ट्रीमिंगही केलं जाऊ लागलंय. दुसऱ्या शहरातील आजींनी झूमवरून मंगलाष्टकं म्हणून लग्नं जमण्याचा एक वेगळाच काळ आपण अनुभवत आहोत.  
 
कोरोनापूर्वी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा किंवा नाटक पाहणं, आपल्यासाठी नित्याची बाब होती. पण, करोनामुळे सिनेमा, सिरियल किंवा नाटक निर्मितीसाठी असंख्य कलाकार तंत्रज्ञांनी एकत्र येऊन काम करण्याची शक्यता बंद झाली. त्यामुळे या क्षेत्रातील व्यावसायिक प्रगतीवर आणि स्वप्नांवर मळभ आलं खरं. पण, या संकटाच्या काळात काही आश्वासक बदलही दिसून आले. याच काळात बाळसं धरलेल्या ओटीटी माध्यमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे लोकांचा मनोरंजनाकडे बघण्याचा एकूण दृष्टीकोनच बदलला. अजूनही थिएटर्स आणि सभागृहे बंदच आहेत. पण फेसबुक किंवा इतर लाईव्ह स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमांमधून मान्यवर कलाकारच नव्हे, तर अनेक गुणी कलावंत आपली कला हिरीरीने सादर करताना दिसतायत. अनेक टीव्ही कलाकारांनी आपापल्या घरी राहूनच नव्या माध्यमांचा वापर करत यू ट्यूबवर स्वतःचे चॅनेल सुरू करून स्वतंत्र ऑनलाईन शोजची निर्मितीही केलीय. या सगळ्यातून मनोरंजन व्यवसायाचं एक वेगळंच रूप आकाराला येताना दिसतंय. आत्तापर्यंत दूरचं वाटणारं कलाक्षेत्र आता मोबाईलच्या क्लिकच्या अंतरावर येऊन पोचलंय आणि प्रत्येक गुणी कलावंताला आपलं टॅलेंट प्रेझेंट करण्याची संधी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सनं मिळवून दिलीय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्याचं मनोरंजन क्षेत्राचं भवितव्य संमिश्र स्वरूपाचं आहे. नव्या दमाच्या कलाकार-तंत्रज्ञ मंडळींना ऑनलाईन लेव्हलवर कामाच्या संधी उपलब्ध आहेत. फक्त मनोरंजन नाही, तर ऑनलाईन ट्रेनिंग सेशन्स, ऑनलाईन इव्हेंट मॅनेजमेंट आणि पेड वेबिनार्स यांतून मनोरंजन आणि व्यवस्थापन यांचा उत्तम समन्वय साधू शकणाऱ्यांसाठी व्यवसायाची नवी दारं खुली आहेत. त्याचप्रमाणे ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरून जगभरचे विविध प्रयोग पाहण्याची संधीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. थिएटर्स सुरू होताच काही काळानं कलाप्रेमी रसिक नव्या नाटकांना, चित्रपटांना नक्कीच गर्दी करतील, पण मधल्या काळात ओटीटीवरील कंटेंटची विविधता पाहून त्यांच्याही अपेक्षा उंचावलेल्या असणं साहजिकच आहे, त्यामुळे दर्जेदार काम करू इच्छिणाऱ्यांना भविष्यात भरपूर प्रमाणात काम मिळू शकेल.
 
तंत्रज्ञानही हवं परफेक्ट! 
आधी फक्त क्रिकेटची मॅच, निवडणुकांचे निकाल अशाच गोष्टी आपण सर्वांनी टीव्हीवरून लाइव्ह पाहिल्या आहेत. त्यामागे नेहमीच एक खूप मोठी टीम कार्यरत असायची. आता कोणतेही कार्यक्रम लाइव्ह करणं हे पूर्वीइतकं किचकट नसलं, तरी ते योग्य रीतीने होण्यासाठी मेहनत घ्यावी लागतेच. लाइव्ह स्ट्रीमिंग इव्हेंटच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून काम करणाऱ्या कन्सेप्ट आयएनसी या कंपनीच्या  सतेज कुलकर्णी यांनी या तांत्रिक बदलांबद्दल सांगताना सांगितले कि, ‘सध्याच्या काळात अशाप्रकारे लोकांना एकमेकांपर्यंत पोहचवण्याचा सगळाच भार इंटरनेटवर आला आहे, त्यामुळे चांगल्या दर्जाचं इंटरनेट, वेगवेगळ्या उपकरणांच्या मदतीने लोकांचे डिजिटल अनुभव अधिकाधिक चांगले करण्याची जबाबदारी तांत्रिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांवर आली आहे. एखाद्या अभिनेत्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय लाइव्ह जाण्यापासून ते घरातच मल्टी कॅमेरा सेट-अप लावून फिटनेस क्लास घेणं, लग्नाचे विधी कोणत्याही तांत्रिक गडबडीशिवाय शेकडो वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहचवणं, हा एक नवा टास्क आहे. या क्षेत्रात आम्ही पूर्वीपासून आहोत, पण सध्या लोकांच्या संख्येवर असलेले निर्बंध पाळून ही तांत्रिक बाजू सांभाळण्याचं आव्हानही आहे. कमीत कमी लोकांमध्ये, जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचा अनुभव प्रेक्षकांना आणि आयोजकांना देण्याचं हे नवं क्षेत्र आहे. मग ते लग्न असो, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन चर्चासत्र, ऑनलाईन मैफिली, शोज किंवा इतर काहीही. प्रेक्षकांचे कमी पेशन्स आणि तंत्रज्ञानामुळे दर्जाच्या बाबतीत वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लोकांवर सध्या आहे.’ हे सारे व्यावसायिक स्वच्छता, सुरक्षितता या सगळ्या गोष्टींची योग्य ती काळजी घेत काम करत आहेत. एकमेकांवरील विश्वास कमी होत असलेल्या या काळात लोकांचा विश्वास संपादन करणं आणि तो टिकवून ठेवणं हेच सर्वांसाठी महत्त्वाचं झालं असल्याने सर्वच व्यावसायांना काही नवे आयाम जोडले गेले आहेत. 
 
आता या ‘न्यू नॉर्मल’ला सरावताना आपण सगळे जणही एका नव्या युगात प्रवेश करत आहोत. आपलं तंत्रज्ञानावर अवलंबून राहणं वाढत चाललं आहे. या नव्या काळात आपण सगळेच जण एक पिढी म्हणून या साऱ्या बदलांना कसे सामोरे जातो, हे पाहणं फारच रंजक असणार आहे!
 
 
-Aditi Atre

Services

PortFolio